रेमडेसिविरचा काळाबाजार पोलीस रोखणार : आयुक्‍त अमिताभ गुप्ता

गुन्हे शाखेची दहा पथके तयार

पुणे – रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे सरसावली आहे. पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करण्याऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी पाऊल उचलले आहे. त्यांनी गुन्हे शाखेची दहा पथके तयार केली आहेत. ही पथके इंजेक्‍शन विकणाऱ्यांची माहिती काढून बनावट ग्राहक बनून आरोपींना जेरबंद करत आहेत. यामुळे कोणी काळ्याबाजारात दामदुप्पट भावाने रेमडसिविर इंजेक्‍शन विकणार असल्याची माहिती मिळाल्यास त्याची खबर पोलिसांना द्यावी, असे आवाहनही अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

पुणे पोलिसांनी मागील आठवडाभरात तीन कारवाया केल्या आहेत. तब्बल 7 जणांना अटक करीत त्यांच्याकडून 7 इंजेक्‍शन जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने केली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. यातील काही आरोपींनी तर रुग्णालयातील इंजेक्‍शन विक्रीसाठी आणली होती.

चंदननगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोहंमद महिरुख पठाण (वय 28), परवेज मैनुद्दीन शेख (वय 36), इम्तियाज युसूफ अजमेरी (वय 52), अश्‍विन विजय सोलंखी (वय 41) यांना अटक करीत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी हॉस्पिटल आणि मेडिकल संबंधित व्यक्‍तींनाच रेमडेसिविर इंजेक्‍शनचा काळाबाजार करताना पकडले आहे. पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये 5 जणांना अटक केली आहे.

पुणे-नगर रस्त्यावर चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पठाण, शेख, अजमेरी आणि सोलंखी या चौघांना दोन इंजेक्‍शन विक्री करत असताना पोलिसांनी पकडले आहे. ते औषध विक्रेते असल्याचे सांगत होते. हे सर्व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. एकाचा शेळीपालनचा व्यवसाय आहे, तर एक जण खासगी वाहनावर चालक आहे. इतर दोघे खासगी नोकरी करतात. यातील एकजण दौंड येथे करोनाची लस घेण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याने तेथून मित्राच्या मदतीने एक इंजेक्‍शन पुण्यात आणले होते.

याअगोदरही त्याने एक इंजेक्‍शन आणून ठेवले होते. ही दोन्ही इंजेक्‍शन प्रत्येकी 18 हजार रुपयाला विकण्याच्या तयारीत आरोपी होते. पोलिसांना याची खबर मिळताच बोगस ग्राहक पाठवून चौघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ढवळे करत आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहिदास बनाजी गोरे (वय 47) याच्यावर लोणीकंद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी औषध निरीक्षक श्रृतिका जाधव यांनी फिर्याद दिली आहे. गोरे याच्याकडे रेमडेसिविरची दोन इंजेक्‍शन आढळून आली. कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या छापील किमतीपेक्षा जास्त किमतीत इंजेक्‍शन विकताना तो आढळून आला. औषध व्यावसायिक असल्याचे भासवून तो ही विक्री करत होता. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराले, उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने केली.

आरोग्य यंत्रणेतील व्यक्‍तींचाही सहभाग…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट प्रिस्क्रीपशनद्वारे काळ्याबाजारात विक्रीसाठी इंजेक्‍शन विकत घेतली जात असल्याची शक्‍यता आहे. तर काहीजण रुग्णालयांशी संबंधित असलेल्या व्यक्‍ती हे इंजेक्‍शन काळ्याबाजारात विक्रीसाठी आणत आहेत. पहिल्या घटनेत अटक केलेल्या आरोपीला त्याच्या नर्स असणाऱ्या मैत्रिणीने रुग्णालयातील इंजेक्‍शन विकण्यासाठी दिले होते. तर तोही एका कोविड सेंटरमध्ये कामाला होता. यामुळे आरोग्य व्यवस्थेशी संबंधित व्यक्‍तीसुद्धा यामध्ये गुंतल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.