महत्वपूर्ण : पुणेकरांनो रेमडेसिवीरसाठी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधा

पुणे – करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला मोठा फटका बसलाय. राज्यात वाढणारी बाधितांची संख्या रोज एक नवा विक्रम करत आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रचंड ताण आल्याचे चित्र असून अनेक जिल्ह्यांमध्ये बेड्स व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. पुण्यात देखील हीच परिस्थिती असल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी कंट्रोल रूम उभारण्याचे आदेश दिले आहेत. या कंट्रोल रूमच्या माध्यमातून जिल्ह्यातील रेमडेसिवीर पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येईल. रेमडेसिवीर औषधाची गरज असणाऱ्या नागरिकांनी 020-26123371 अथवा टोलफ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कंट्रोलरूम ३१ मे पर्यंत कार्यरत राहणार आहे.


दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे इंजेक्शन अथवा ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी देशातील करोना परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत लागू असेल.

काय आहेत केंद्र सरकारचे आदेश?

पुढील काही दिवसांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्‍शनच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे औषानिर्माण विभाग देशामध्ये रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात असून त्याचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे.

तसेच औषधनिर्माण विभागाने या इंजेक्‍शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपल्या वेबसाईटवर आपल्याकडील रेमडेसिवीरचा उपलब्ध साठा व अधिकृत विक्रेते याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्याचा सल्ला दिलाय. याखेरीज संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना रेमडेसिवीरचा काळाबाजार व साठेबाजी होऊ नये यासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.