“हायटेक’च्या जमान्यात निष्ठावंत औषधापुरतेच शिल्लक

नांदुर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता आवघे तीन दिवस राहिले असून सर्वच उमेदवारांनी प्रचाराची जोरदार राळ उडवली आहे. त्यामुळे निवडणूक म्हटली की “धुरळा’ हे वाक्‍य दौंड विधानसभा मतदारसंघात तंतोतंत खरे ठरले आहे. एक गेला की दुसरा दुसरा गेला की तिसऱ्या… उमेदवाराचा प्रचार कानी येत असल्याने दौंडमधील गावागावांत निवडणुकीशिवाय दुसरा विषय नसल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या ऍनरॉईडच्या जमान्यात नेते व कार्यकर्त्यांसह प्रचारही “हायटेक’ झाला आहे. तर निष्ठावंत कार्यकर्ते औषधापुरतेच शिल्लक राहिले आहेत.

वीस वर्षांपूर्वी घराघरांत पक्ष व नेत्यांवरील निष्ठेचे बाळकडू मिळत होते. निवडणूक आली की स्वतःची भाकरी बांधून पदरमोड करून सायकलने, एस.टी.ने अथवा प्रसंगी पायपीट करत कार्यकर्ते प्रचारासाठी जात होते. निवडणूक काळात घरे अथवा सार्वजनिक इमारतींच्या भिंती चुन्याने रंगवल्या जात होत्या. त्यावर निळ्या रंगाने उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह रंगवलेले असायचे. भिंतीवर जागोजागी खळीने चिटकवलेली पोस्टर्स आणि घराघरांवर डौलाने फडकणारे पक्षीय झेंडे असे निवडणुकीचे चित्र होते. मध्येच एखादी गाडी धुरळा उडवत घोषणा देत जात होती.

अनेकदा कार्यकर्ते सायकलला झेंडे लावून सायकल फेरी अथवा पदयात्रा काढत होते. कार्यकर्त्यांकडे अपार निष्ठा आणि चिकाटी होती. सध्याच्या निवडणुकीत पांढरी शुभ्र-खादीधारी पुढाऱ्यांऐवजी स्टार्चची अथवा रंगीबेरंगी कपडे व जीन्समधील पुढाऱ्यांची संख्या वाढली आहे. काळानुसार प्रचाराची संकल्पनाही बदलली आहे. सोशल मीडिया मोबाइल व्हॅनमधून प्रचाराची यंत्रणा राजमान्य व लोकमान्य झाली आहे. त्यामुळे खळ पोस्टर लावणारे कार्यकर्तेही कालबाह्य झाले आहेत. पूर्वी निष्ठेवरून संभाव्य मतदानाची आकडेमोड केली जात होती. मात्र, आता जनताच अंदाज देत नसल्याने आकडेमोड तज्ज्ञांची गरज राहिलेली नाही. बदलत्या युगाबरोबर बदलणाऱ्या निवडणुकीत नव्या पिढीच्या मानसिकतेचे प्रतिबिंबच दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.