जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच; तिघांना अटक

अकलूज -अकलूज शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रेमडेसिविर इंजेक्‍शनचा तुटवडा असताना छापील किमतीपेक्षा अधिक किंमत घेऊन काळ्या बाजारात विकताना आप्पासाहेब सुग्रीव किर्दकर (रा. लाखेवाडी ता. इंदापूर, सध्या रा. अकलूज), अजय महादेव जाधव, कुमार महादेव जाधव (दोघेही रा. संग्रामनगर, अकलूज) यांना अटक करण्यात आली आहे.

अकलूज बायपास रोडजवळ बुधवारी (दि. 5) रात्री 10 च्या सुमारास अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना मिळालेल्या माहितीनुसार अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील काही व्यक्ती रेमडेसिविर इंजेक्‍शनची बॉटल (व्हायल) छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने विक्री करून या औषधाचा काळाबाजार करीत असल्याचे समजले.

त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड यांच्यासह सुहास क्षीरसागर, विक्रम घाडगे, मंगेश पवार, निलेश काशीद, अमित यादव यांचे पथक तयार करून सापळा रचून वरील तिघांना अटक केली. हे तिघे कोणताही परवाना चिठ्ठीशिवाय आणि विना कोविड तपासणी अहवाल असल्याशिवाय 35 हजार रुपयांना हे इंजेक्‍शन विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.