वाघोली (प्रतिनिधी) : भावडी रोडवरील पूर्वरंग सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या वाघोली एमएसईबी ऑफिसचे स्थलांतर सोमवार (दि.२७) पासून बकोरी रोड येथील न्याती सोसायटी समोर झाले आहे. भावडी रोडवरील ऑफिसमध्ये जाणवणारी जागेची कमतरता व पावसाळ्यात होणाऱ्या अडचणीमुळे महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची सुटका होणार आहे.
वाघोली सहाय्यक अभियंत्यांचे ऑफिस भावडी रोडवरील पूर्वरंग सोसायटीमध्ये अनेक वर्षांपासून होते. वाघोलीतील वाढते नागरिकीकरण आणि ग्राहक संख्या ६० हजारच्या पुढे गेली असल्याने याठिकाणी कामगार व अधिकारी यांना जागा अपुरी पडत होती.
पावसाळ्यात ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांना देखील अडचणी येत होत्या. यापूर्वी दोन वेळा महावितरणचे ऑफिस बकोरीरोडला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ग्रामस्थांनी विरोध केल्याने पुन्हा भावडी रोडला सुरु राहिले. अखेर सोमवार (दि.२७) पासून बकोरी रोडच्या न्याती सोसायटी समोर स्थलांतरीत करण्यात आले आहे.
वाघोली महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत जवळपास ६० हजाराहून अधिक ग्राहक आहेत. मागील दोन वर्षांपासून वाघोली उपविभागीय कार्यालय करण्याचा प्रस्ताव महावितरणच्या दरबारी पडून आहे. या प्रस्तावानुसार वाघोलीचे वाघोली १, वाघोली २, वाघोली ग्रामीण असे तीन विभागात वर्गीकरण केले जाणार आहे. वाघोली येथे उपविभागीय कार्यालय करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तातडीने प्रयत्न करत आहोत.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच वाघोली