बंगलुरू: कर्नाटक सरकारने बंगलुरू येथील काही सरकारी कार्यालयांचे बेळगावातील विधानभवनात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हे आदेश दिले आहेत. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी ही उपाययोजना केली असून महिना भरात ही कार्यालये तिकडे हलवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.
आपण स्वत: तेथील कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राने बेळगाववर दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव वरील कर्नाटक सरकारचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठीची ही खेळी येडियुरप्पा यांनी केली आहे. कॉंग्रेस जेडीएस सरकारने सन 2018 मध्ये काही सरकारी कार्यालये बेळगावला हलवण्याचा निर्णय तत्वता घेतला होता.पण त्याची अंमलबजावणी आता येडियुरप्पा सरकारने केली आहे.
बेळगावात गेल्या वर्षी पूर आला होता. त्यात त्या शहरातील अनेक रस्ते आणि पुलांचे नुकसान झाले होते. त्याची कामे त्वरित पूर्ण करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी पाचशे कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. त्या जिल्ह्यातील शिवमोगा विमानतळाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा आदेशही येडियुरप्पा यांनी एका बैठकीत दिला. बेळगाव जिल्ह्यातील 1650 किमी रस्त्यांचे अपग्रेडेशन करून जिल्ह्यातील 10110 किमी लांबीच्या मुख्य रस्त्यांचे राज्य महामार्गात रूपांतर करण्याचा आदेशही येडियुरप्पांनी दिला आहे.