गवळी उद्यानात वाढली बेकायदा धार्मिक स्थळे

महापालिकेचे दुर्लक्ष ः विविध संस्थांकडून घेण्यात आला जागेचा ताबा विविध धर्मांची डझनभर प्रार्थना स्थळे

पिंपळे गुरवच्या घटनेनंतरही महापालिका सुस्त

काही महिन्यांपूर्वी पिंपळे गुरवमध्ये बेकायदा बांधल्या जात असलेल्या एका मंदिराचे बांधकाम कोसळून तीन मजुरांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे होत, हे बांधकाम पाडले होते. एकाच ठिकाणी कारवाई करून त्यानंतर पालिका प्रशासन पुन्हा सुस्त झाले. गवळी उद्यानातही अशा प्रकारची घटना होण्याची महापालिका प्रशासन वाट पाहत आहे का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पिंपरी – भोसरी-आळंदी रस्त्यावर असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळी उद्यानात बेकायदा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच सर्व धर्मांची धार्मिक स्थळे एका रांगेत उभी केलेली असताना आणखी दोन धार्मिक स्थळांची यात भर पडली आहे. गेल्या दहा दिवसांत या ठिकाणी दोन प्रार्थना स्थळांच्या पायाभरणीसाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. आता येथील बेकायदा प्रार्थनास्थळांची संख्या एक डझनावर पोहोचली आहे. राजकीय पाठबळामुळे महापालिका प्रशासनाकडून याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात असल्याने उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.

29 सप्टेंबर 2009 नंतर बांधण्यात आलेली बेकायदा प्रार्थना स्थळे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच नव्याने बेकायदा प्रार्थना स्थळे उभी राहू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाला आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील बेकायदा प्रार्थनास्थळांची यादी करुन, त्यापैकी कोणती प्रार्थनास्थळे हटविणे योग्य राहील, स्थलांतरीत अथवा आहे त्याच ठिकाणी ठेवणे संयुक्‍तिक राहील, यावर महापालिका प्रशासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर शहरातील बेकायदा प्रार्थनास्थळे होऊ न देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन योग्यप्रकारे पार पाडत नसल्याची बाब समोर आली आहे. भोसरी-आळंदी रस्त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची बालोद्यानासाठी जागा आरक्षित आहे. या जागेवर उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे. त्याठिकाणी कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानाचा फलकदेखील लावण्यात आला आहे.

या उद्यानाच्या पाठीमागे गणेशनगर असून, 20 ते 30 घरांसाठी या उद्यानातून रस्ता सोडण्यात आला आहे. या रस्त्याला लागूनच अनेक प्रार्थना स्थळे उभारून या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. दिवसेंदिवस या अतिक्रमणामध्ये भरच पडत आहे. या उद्यानाच्या जागेत विविध धर्मांची प्रार्थनास्थळे तयार करण्यात आली आहेत. सणासुदीला याठिकाणी जेवणाच्या पंगती उठत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन, या जागेवर मालकी हक्क गाजविला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये या अतिक्रमणांविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या प्रार्थनस्थळांचा पंचनामा करण्यात आला होता. मात्र. यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनांमधून या जागेत कचरा संकलित करण्याचे काम केले जात होते. मात्र, काही दिवसांपासून हे काम थांबविण्यात आले आहे. या जागेचा ताबा दोन बेकायदा प्रार्थनास्थळांनी घेतला आहे. याठिकाणी धार्मिक संस्थांचे फलकही झळकू लागले आहेत. एवढ्यावर ही बाब थांबली नसून आता याठिकाणी खोदकामही सुरू करुन पाया भरणीचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेकडून याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, हे विशेष.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.