इस्रायलमधील धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी; 40 ठार

जेरुसलेम, दि. 30 – इस्रायलमध्ये एका धार्मिक उत्सवाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान चाळीस जण ठार झाल्याचे वृत्त आहे. शेकडो लोक त्यात जखमी झाले असून अनेक जण बेपत्ता आहेत. उत्तर इस्रायलमधील एका ज्युईश धार्मिक उत्सवाच्यावेळी हा प्रकार घडला. तेथील माऊंट मेरॉनवर या उत्सवात रात्रभर आतषबाजी, नाच गाणी असे कार्यक्रम होते.

त्यासाठी हजारो लोक तेथे जमले होते, त्यावेळी हा प्रकार झाला. ज्यू धर्मातील दुसऱ्या शतकातील संत पुरुष रब्बी शिमोन बर योचाय यांची तेथे समाधी आहे. त्यांच्या समाधीस्थळी दरवर्षी हा उत्सव होतो. ज्यू धर्मीयांसाठी हे अत्यंत पवित्र धर्मस्थळ मानले जाते. इस्रायलमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने तेथे करोना निर्बंध उठवण्यात आले असून तेथे सार्वजनिकस्थळी लोकांना मास्क घालण्याचे निर्बंधही नुकतेच काढून टाकण्यात आले आहेत.

त्यामुळे या उत्सवासाठी लोकांनी तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यात किमान चाळीस जण ठार झाल्याची अधिकृत सूत्रांनी पुष्टी केली आहे. जखमींची संख्या दीडशेच्या पुढे आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. त्यावेळी तेथे सुमारे एक लाख लोक उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी तेथे आणखी एक लाख लोक जमणे अपेक्षित होते.

उत्सवाचे हे स्थळ अत्यंत गजबजलेल्या भागात आहे. त्यामुळे तेथे आयत्यावेळी मदत पथके पोहोचवणेही जिकिरीचे ठरले. बाकीच्या लोकांनी आता उत्सवस्थळी जाण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.