टाटा स्टीलचा कर्मचाऱ्यांना दिलासा; एक वर्ष कर्मचारी किंवा वेतनकपात नाही!

नवी दिल्ली: करोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने नोकर कपातीची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र, टाटा स्टीलने कर्मचारी कपात किंवा पगार कपात करणार नसल्याचे स्पष्ट करीत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

टाटा समूहाच्या मालिकीची असलेली टाटा स्टीलचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी टी. व्ही. नरेंद्रन्‌ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कर्मचारी आणि पगार कपात करणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. कंपनीचे लक्ष्य फक्त सध्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उत्पादकता वाढवण्याची आणि त्याच विकास करण्याची आहे. परिस्थितीत सुधारणा होईल, तशी एक दीर्घकालीन योजना तयार केली जाणार असल्याचे नरेंद्रन्‌ यांनी सांगितले.

लॉकडाऊन हटवल्यानंतर बाजारपेठेची स्थिती कशी असेल, मागणी किती असेल यावर बोलताना ते म्हणाले, अजून परिस्थिती सामान्य झालेली नाही. लॉकडाऊन लवकर हटवला जाईल, अशी अशा आहे. पण, त्यानंतर सर्व काही सुरळीत होण्यास सहा महिने ते एक वर्ष लागेल. आपण कोरोनाविरोधात कसे लढणार आहोत, यावर हे अवलंबून असेल, असे त्यांनी सांगितले.

पोलाद उत्पादनाचा समावेश अत्यावश्‍यक सेवेमध्ये करण्यात आला आहे. असे असले तरी पोलाद उत्पादनात कपात केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी एक आव्हान असून, टाटा स्टीलचे कलिगानगर, जमशेदपूर आणि अंगूल येथील प्रकल्प सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फक्त पोलादाची निर्मिती होऊ शकत नाही. त्याच्या जोडीला अन्य गोष्टींची गरज असते. सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलावणे धोक्‍याचे असल्याने टाटा स्टीलच्या प्रकल्पातील उत्पादन 50 टक्के इतके सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

युरोपमध्ये लॉकडाऊन नसल्याने टाटा स्टीलचे प्रकल्प सुरू आहेत. पण, युरोपमध्ये वाहन क्षेत्रात मंदी आहे. तेथे ईस्टर नंतर परिस्थिती सामान्य होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून कंपनीच्या नफ्यात घट होत आहे. पण, यासाठी दीर्घकालीन योजना आहे. त्यावर काम सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.