बारामती (प्रतिनिधी) – जनता कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी रविवारी बारामती शहर व तालुक्यात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी नव्याने केवळ 26 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. बारामतीसाठी ही बाब दिलासादायक आहे. असे असले तरी आज सोमवार दि (21) पासून जनता कर्फ्यू हटविण्यात आले असून बारामतीचे व्यवहार नियमित सुरळीत झाले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात पुन्हा गर्दी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. विनाकारन गर्दी टाळण्याचे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दि (19 ) रोजीच्या प्रतीक्षेत असलेले व दिनांक 20 रोजी सरकारी व खाजगी प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांपैकी 26 व्यक्ती कोरोना संक्रमीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये शहरात 21 रुग्ण आढळले तर ग्रामीण भागात पाच रुग्ण आढळून आले. बारामती शहर व तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 668 इतकी झाली असून 1 हजार 432 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे.