प्रकाश गायकर
पिंपरी – शहरामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहर रेड झोनमध्ये येत असल्याने तसेच शहरातील रुग्णांची संख्या दिवासागणिक वाढत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. याच संधीचा फायदा घेत शहरातील काही जणांनी निर्जंतुकीकरणाचा धंदा सुरु केला आहे. त्याला नागरिकही बळी पडत असून प्रति चौरस फुटाच्या हिशोबाने सोसायट्यांमध्ये सॅनिटायझेशन करून घेत आहे.
यावर महापालिका प्रशासनाने आळा घालणे आवश्यक आहे. शहरात 3 मे नंतर काही प्रमाणात औद्यगिक कंपन्या सुरु करण्याच्या विचारात प्रशासन आहे. सध्या करोनाची भीती असल्याने कामगार वर्ग तसेच शहरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. त्यांच्या या भीतीचा फायदा घेत काही जणांनी शहरात निर्जतुकीकरणासाठी फवारणी गाड्या सुरु केल्या आहेत. काही ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडचे टनेल उभारले आहे. मात्र शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला तर या सोडियम हायपोक्लोराइडमुळे डोळ्यांच्या श्लेष्मल आवारणाला, नाकावर व त्वचेवर त्याचे घातक परिणाम होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. मात्र असे असतानाही सोशल मीडियावर याबाबत अनेक संदेश फिरत आहेत. शहरातील बॅक, कंपन्या, कार्यालये, सोसायट्या याठिकाणी प्रति चौरस फूट एक रुपयांने फवारणी करून देणार असल्याचे या संदेशात आहे. तसेच चिंचवड येथील एका सोसायटीमधील नागरिकांनी पंधरा हजार रुपये देत फवारणी करून घेतली आहे.
वास्तविक पाहता या फवारणीचा परिणाम केवळ दोन ते तीन तास होतो.तसेच यामुळे डोळ्यांच्या विकाराला सामोरे जावे लागते. डोळ्यांची जळजळ होणे, लाल होणे असे प्रकार या फवारणीतून होत असल्याचे निमा संस्थेचे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी सांगतिले.
मंदीतही पैसे कमविण्याची शक्कल
सोडियम हायपोक्लोराइडची पाच लिटरची किमत 250 रुपये आहे. एक लिटर पाण्यामध्ये 10 मिली क्लोराइड मिसळून फवारणी केली जाते. म्हणजेच पाच लिटर सोडियम हायपो क्लोराइडमध्ये दहा इमारती फवारुन होतील. त्यासाठी 4500 रुपयांचा एक पंप आणि सोडियण हायपोक्लोराइड पाच लिटर त्याचे 500 रुपये खर्च करावे लागतात. असे सगळे मिळून 5 हजार रुपयांमध्ये काही जणांनी मंदीमध्ये तेजीत सुरु राहणारा नवीन धंदा शोधला आहे. नागरिकांना करोना विषाणूची भीती दाखवून आपले उखळ पांढरे करण्याचा हा प्रकार आहे.
——————–