पुण्याहून मुंबईला जाणाऱ्यांना ‘एसटी’चा दिलासा

पुणे – तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 9 ऑगस्टपर्यंत पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत प्रवाशांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) स्वारगेट येथून 25, पुणे स्टेशन येथून 25 तर, लोणावळ्यातून 10 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

पुणे-मुंबई मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व दुरुस्तीचे काम सुरळीत पार पडण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती या महत्त्वाच्या गाड्यांसह इतर काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. पुण्यावरून रोज मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामध्ये नोकरदार वर्ग, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रेल्वे बंदमुळे त्यांना एस. टी. महामंडळाने पर्यायी व्यवस्था केली आहे. यासाठी एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

“रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन व लोणावळा येथून दररोज 60 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. रेल्वेचे तांत्रिक काम पूर्ण होईपर्यंत जादा बसेस सुरू राहणार आहेत. तसेच, या एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास बसची संख्या वाढविण्यात येणार आहेत.’
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.