पुणे – शहरात मागील आठवड्यापासून हुलकावणी देणारा पाऊस शुक्रवारी बरसल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. याशिवाय शनिवारी शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा, तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागील 24 तासांत राज्यात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. शहरात मध्यवर्ती भागासह उपनगरांकडे श्रावणसरी बरसल्या. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
याशिवाय, शनिवारी राज्यात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तविली आहे.
शहरात मागील 24 तासांत पुणे येथे 0.9 मिमी आणि पाषाण येथे 3 मिमी पावसाची नोंद झाली. यासह या हंगामात पुणे येथे 341.5 मिमी, लोहगाव येथे 404.2 मिमी, पाषाण येथे 266.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.