जीवनशैलीमध्ये सुधारणा करून मधुमेहापासून मुक्तता मिळवता येते तसेच दिवसातून कमीवेळा खाणे हे आरोग्यासाठी हितावह असून दिवसातून भुकेच्या कोणत्याही 2 वेळा निवडा व तेव्हाच पोटभर जेवण करा. मधुमेहापासून मुक्तता मिळवण्यासाठी आहार, व्यायाम, आंतरिक परिवर्तन आणि औषधोपचार हे चार सरळ नियम आहेत. आहार हा केवळ एकमेव घटक मधुमेहापासून मुक्तता मिळवण्यासाठी जबाबदार नाही; परंतु दिवसातून कमीवेळा खाणे किंवा उपवास आदी गोष्टी डायबेटीसच्या रुग्णांसाठी नक्कीच फायदेशीर आहेत.
आहाराच्या या सवयी हे केवळ मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आदींच्या रुग्णांसाठी मर्यादित नसून सर्वांसाठीच उपयुक्त आहेत. रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या जवळच्या आणि प्रियजनांच्या आरोग्याचे चांगले व्यवस्थापन करण्याच्या हेतूने नेमका कुठला आहार आणि जीवनशैली अवलंबवावी या संबंधीचे सखोल मार्गदर्शन सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
जीवनशैली संबंधित सर्व विकारांच्या व्यवस्थापनामध्ये आहार सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्रत्येक आजाराच्या व्यवस्थापनामध्ये निरनिराळ्या आहाराची शिफारस केली जाते. आज जनमानसामध्ये दीक्षित आहार तसेच त्रिपाठी आहार खूप लोकप्रिय झाले आहेत. हे सर्व आहार प्रकार आजारांचा प्रतिबंध किंवा संबंधित विकारांच्या प्रगतीची गुंतागुंत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आले आहेत.