– विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूका झाल्या होत्या. प्रश्नपत्रिकेतील कवितेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
यंदा बारावीच्या परीेक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 7 लाख 92 हजार 780 मुले तर 6 लाख 64 हजार 441 मुलींचा समावेश आहे. 3 हजार 195 केंद्रावर परीक्षा सुरु आहेत. 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होता. या पेपरमध्ये कवितेवरील ऍक्टीव्हिटीवरील विचारण्यात आलेल्या अ-3.अ-4,अ-5 अशा तीन प्रश्नांमध्ये चूका झाल्या होत्या. प्रिटींग मिस्टेकमुळे यात मॉडेल ऍन्सरमधील उत्तरेच छापण्यात आली होती. प्रत्येकी दोन गुणांचेप्रमाणे सहा गुणांचे हे तीन प्रश्न होते. हे प्रश्नच विद्यार्थ्यांना समजले नाहीत. हे प्रश्न आहेत की उत्तर याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मुख्य नियामकांनीही प्रश्नपत्रिकेतील चूकांप्रकरणी विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याबाबतचा अहवाल राज्य मंडळाकडे दिला होता. सर्वच विद्यार्थ्यांना या चूकांप्रकरणी सरसकट गुण देण्याचा आग्रह विद्यार्थी, पालक, शिक्षक व त्यांच्या संघटनांनी धरला होता.
प्रचलित पध्दतीनुसार इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील चूका निदर्शनास आणून देण्यात आल्या. अहवालानुसार त्रुटी असलेल्या प्रश्नांचे गुण देण्याबाबतचा निर्णयही तात्काळ घेण्यात आला. पोयट्री सेक्शन-2, पोयट्री, सेक्शन -2 असा उत्तरपत्रिकेत उल्लेख केला असल्यास, पोयटी सेक्शन-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास, त्रुटी असलेल्या प्रश्नांचे अ-3, अ-4, अ-5 असे क्रमांक उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास अशा परिस्थितीत या पैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांने केले असल्यास विद्यार्थ्यांस प्रत्येक प्रश्नांचे दोन गुण याप्रमाणे एकूण सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.