दखल : कृषी निर्यातीचा दिलासा आणि आव्हाने

विलास कदम

देशात अंदाजित अन्नधान्याचा साठा हा गरजेपेक्षा तीनपट अधिक आहे. अशावेळी अन्नधान्याची निर्यात यशस्वीरीतीने वाढवता येणे शक्‍य आहे. निर्यात वाढवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक प्रयत्नही करायला हवेत.

करोना साथीच्या संकट काळात देशात कृषी उत्पादनाच्या निर्यात विक्रमी वाढ होण्याची शक्‍यता दिसत आहे. कृषी उत्पादनाची निर्यात वाढवण्यावर काम करत आहे. देशात 1 एप्रिल 2021 पर्यंत केंद्रीय गोदामात सुमारे 7.72 कोटी टन अन्नधान्याचा साठा आहे. हा साठा गरजेपेक्षा तीनपटींनी अधिक आहे. अशावेळी चालू वर्षात जागतिक मागणीनुसार अन्नधान्य निर्यात वाढवण्याला वाव आहे. 

21 एप्रिल रोजी कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यांच्या काळात देशात 2.74 लाख कोटी रुपयांचे कृषी उत्पादनांची निर्यात करण्यात आली. वर्षभरापूर्वी याच कालावधीत झालेल्या 2.31 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत आजची निर्यात 16.88 टक्‍के अधिक आहे, तसेच कृषी आणि संबंधित वस्तूंची आयात देखील तीन टक्‍क्‍यांनी वाढवून 1.41 लाख कोटी रुपये झाली आहे.

आपण कृषी निर्यातीचे आकडे पाहिल्यास तांदूळ, गहू आदींच्या निर्यातीत एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यान वेगाने वाढ झाली आहे. सध्याच्या काळात जगातील बहुतांश मोठे अन्नधान्य निर्यातक देश तांदूळ, गहू, मका आणि अन्य कृषी पदार्थ निर्यात करण्याच्या आघाडीवर मागे राहिले. अशा वेळी भारताने या संधीचा लाभ उचलत निर्यात वाढवली. भारतातून गव्हाच्या निर्यातीत विक्रमी वाढ दिसून आली.

गव्हाची निर्यात वर्षभरापूर्वीच्या 425 कोटी रुपयांवरून 3283 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेषत: अफगाणिस्तानला 50 हजार टन आणि लेबेनॉनला 40 हजार टन गहू निर्यात करण्यात आला. बिगर बासमती तांदळाची निर्यात 13030 कोटी रुपयांवरून 30 हजार 277 कोटी रुपयांवर पोचली आहे. भारताने ब्राझील, चिलीसारख्या नवीन बाजारातही आपले बस्तान बसवले आहे. विशेष म्हणजे चीनने देखील भारताकडून बासमती खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अन्नधान्याशिवाय अन्य कृषी उत्पादकांचे निर्यात मूल्य देखील चांगले वाढले आहे.

करोना महासाथीच्या काळात जगभरात लॉकडाऊन लागू असून करोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रवासावर बंदी आणली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थाच्या खरेदीत अडचणी आल्या. अशा वेळी कृषी निर्यातीसबंधीची विविध आव्हाने बाजूला करण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया खाद्य निर्यात विकास प्राधिकरण (एपिडा) यांनी जागतिक कृषी व्यापार प्रदर्शन आणि देशातील कृषी पदार्थाची निर्यात करणाऱ्या लोकांसमवेत वेगवेगळ्या “इंटरॅक्‍शन ऑनलाइन मीट’चे आयोजन केले. 

एवढेच नाही तर “एपिडा’ने कृषी निर्यातीच्या विविध विभागाशी समन्वय ठेवला आणि निर्यात वाढवण्यासाठी दररोजच्या आधारावर कृषी निर्यातदारांसमवेत संपर्क ठेवला. विशेष म्हणजे भारतातून कृषी पदार्थाची निर्यात वाढवण्यात काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यात कृषी, संशोधन आणि कृषी मानकांना मिळालेली जागतिक मान्यता याचा उल्लेख करावा लागेल.

आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्यातीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मते, 2020-21 साठी मुख्य पिकांच्या दुसऱ्या अंदाजित अहवालानुसार अन्नधान्यांचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्‍यता असून ते 3033.4 लाख टन अंदाजित आहे; पण यासाठी कृषी निर्यातीला विक्रमी पातळीवर पोहोचण्यासाठी निर्यातीतील अनेक अडथळे दूर करण्याची गरज आहे.

उदाहरणदाखल पशुधनाच्या बाबतीत आयात करणारे अनेक देश मांस आणि दुधापासून तयार झालेल्या उत्पादनासाठी आजार मुक्‍त स्थितीची अट घालत आहेत. काही देशांच्या मते, कृषी उत्पादनाचे कीट हे मुक्‍त क्षेत्राच्या आधारे निर्यात व्हायला हवे. या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित देशांशी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यासपीठावरून चर्चा पुढे नेणे गरजेचे आहे. कृषी निर्यातीसंबंधी पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञांच्या गटाने केलेल्या शिफारशींवर देखील सरकारने अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आणि फायद्याचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.