बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, गायक हिमेश रेशमियाचा “आप का सुरूर’ हा अल्बम खूपच हिट ठरला होता. या अल्बममुळे हिमेशला देशभरात प्रसिद्धि मिळाली होती.
यानंतर आता हिमेश आपला आणखी एक अल्बम “सुरूर 2021′ चाहत्यांसाठी घेवून येत आहे. या अल्बममधील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात हिमेश पुन्हा एकदा आपल्या जुन्या लुकमध्ये दिसून येत आहे.
या गाण्यात हिमेश रेशमिया दोन वेगवेगळ्या अंदाजात दिसून आला आहे. या व्हिडिओमध्ये एकीकडे तो रॉकस्टारच्या भूमिकेत दिसत आहे, जो आपल्या आयकॉनिक टोपीत झळकला आहे. तर दुसरीकडे तो सूट-बूटमध्ये एक उद्योगपती असल्याचे दिसून येत आहे.
तसेच या व्हिडिओमध्ये हिमेशसोबत उदिती सिंह झळकत आहे. या गाण्यासाठी हिमेशनेच म्यूझिक, लिरिक्स दिलेले आहे. हे गाणे चाहत्यांना खूपच आवडले आहे. यावर अनेकांनी कमेंटस् शेअर करत हिमेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
हिमेशच्या या अल्बममधील अन्य गाणेही लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. उदिति सिंह एक न्यूकमर असून या व्हिडिओमधूनच ती डेब्यू करत आहे. या गाण्यामधील हिमेश आणि उदितीची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूप आवडली आहे.
दरम्यान, हिमेश रेशमियाचा “आप का सुरूर’ हा अल्बम 2006मध्ये रिलीज झाला होता. या अल्बममधील सर्व गाणे हिट ठरले होते. हा अल्बम भारतातील सर्वाधिक विक्री झालेल्या अल्बमपैकी एक आहे.