“इंदू की जवानी’मधील पहिले गाणे रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणीच्या आगामी “इंदू की जवानी’ चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याने रिलीज होतच यू-ट्युबवर धम्माल केली आहे. “हसीना पागल दीवानी…’ असे गाण्याचे बोल असून ते “सावन में लग गई आग’ या सुपरहिट गाण्याचा रीमेक आहे.

हे गाणे मिका सिंह यांनी गायले आहे. या गाण्यात कियारा आडवणी धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. कियारा आडवाणीचा या गाण्यातील लूक खूपच हॉट असून तिने ब्ल्यू कलरचा लहंगा घातलेला आहे. “हसीना पागल दीवानी’ हे गाणे मंगळवारी रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर एकाच दिवसात त्याला 28 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. कियारा आडवाणीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

कियाराचे हे गाणे चाहत्यांना खूपच आवडले असून यावर अनेक कमेंटस्‌ येत आहेत. दरम्यान, कियाराने 2014 मध्ये “फगली’ चित्रपटातून आपली कारकीर्द सुरू केली होती. तिच्या आगामी चित्रपटांबाबत सांगायचे झाल्यास ती लवकरच अक्षय कुमारसोबत “लक्ष्मी बॉम्ब’, सिद्धार्थ मल्होत्रासोबत “शेरशाह’, कार्तिक आर्यनसोबत “भूलभुलैया-2′ आणि “इंदू की जवानी’ आदी चित्रपटात झळकणार आहे. तसेच कियाराने तेलुगू “भारत अने नेनू’ चित्रपटातूनही खूप प्रसिद्धी मिळविली होती.

यात तिच्यासह आघाडीचा अभिनेता महेश बाबूने भूमिका साकरली होती. याशिवाय शाहीद कपूरसोबच्या “कबीर सिंह’मुळेही कियाराला लोकप्रियता मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.