बोकारो – झारखंड मधील बोकारो जिल्ह्यातील खाणीत शुक्रवारी दरड कोसळल्यामुळे तेथे अडकून पडलेल्या चार जणांची आज तेथून सुटका झाली आहे. या खाणीत बेकायदेशीरपणे खाण काम करण्यासाठी ते शुक्रवारी तेथे उतरले होते.
एकूण सहा जण तेथे उतरले होते, त्यावेळी खाणीचा मोठा भाग अचानक खचला आणि त्यात ते अडकून पडले होते. तथापि त्यातून दोन जण या आधीच बाहेर पडण्यात यशस्वी झाले पण गेले काही दिवस चार जण तेथेच अडकून पडले होते. पण या चौघांनी स्वत:हूनच तेथे खोदकाम करून बाहेर पडण्याचा मार्ग तयार केला आणि सोमवारी सकाळी ते तेथून बाहेर पडले.
या अडकून पडलेल्यांच्या मदतीसाठी तेथे एनडीआरएफच्या पथकांचीही मदत घेतली गेली होती. तथापि अडकून पडलेल्या चौघांनीच खचलेला भाग दूर करीत तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर स्वत:ची सुटका केली.