मुंबई – अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित “मैदान’ची रिलीज डेट निश्चित झाली आहे. पुढच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी, 15 ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे. 1950 ते 1963 च्या कालावधीत फुटबॉलच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आणि मॅनेजर असलेल्या सैय्यद अब्दुल रहिमच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमात अजय देवगण अब्दुल सैय्यद रहिमच्या रोलमध्ये दिसणार आहे.
सिनेमाच्या अखेरच्या शेड्युलच्या शूटिंगची सुरुवात जानेवारी 2021 मध्ये होणार आहे. “मैदान’च्या काही भागाचे शूटिंग लखनौ, कोलकाता आणि मुंबईमध्ये झाले आहे. जर देशात करोनाची साथ पसरले नसती, तर आतापर्यंत “मैदान’चे शूटिंग पूर्ण झाले असते आणि सिनेमा प्रदर्शनासाठी तयार देखील झाला असता. आता “मैदान’चे 65 टक्के शूटिंग झाले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार “मैदान’ पुढच्या वर्षी 13 ऑगस्टला रिलीज करायचे ठरले होते. मात्र लॉकडाऊनचे निर्बंध वाढल्यामुळे रिलीज डेट ऑगस्ट ऐवजी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली गेली. अजय देवगण पहिल्यांदाच एखाद्या क्रीडा विषयक सिनेमामध्ये लीड रोल करतो आहे. “मैदान’मध्ये त्याच्या बरोबर प्रियातमी, गजराज राव आणि रुद्राणी घोष हे बंगाली कलाकारही दिसणार आहेत. “बधाई हो’चे डायरेक्टर अमित शर्मा या सिनेमाचे दिग्दर्शक आहे.