नगर (प्रतिनिधी) – नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज पहाटे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली. डॉक्टरांच हालगर्जीपणामुळेच रुग्ण दगावल्याची त्या नातेवाईकांची भावना होती.
नगर तालुक्यातून आलेल्या एक करोनाबाधित रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्या रुग्णांची प्रकृती खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब रुग्णांच्या नातेवाइकांना समजल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. त्यातील एकाने कोविड वार्डच्या दरवाजाच्या काचा फोडल्या.
दरम्यान, नातेवाईकांच्या या आक्रमक भूमिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तत्काळ तोफखाना पोलिसांना याबाबत कळविले. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना समजाविले. त्यानंतर रुग्णालयातील तणाव निवळला. रात्री उशिराापर्यंत या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.