पिंपरी – बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण होय. सध्या करोनाचे सावट असले तरीही बहिणीचे रक्षण करणाऱ्या भाऊरायाचे हात भक्कम करण्यासाठी घरोघरी हा सण साजरा होणार आहे. त्यासाठी राखी बनविण्यात सध्या अनेक हात व्यस्त आहेत. चिंचवड येथील दृष्टीहीन बांधव देखील राख्या बनवून नात्यांचे बंध जुळविण्याचे काम करीत आहेत.
रक्षाबंधनाचा सण पुढील महिन्यात आहे. रक्षाबंधनाला पोस्टाने आणि कुरियरद्वारे राख्या पाठविल्या जातात. त्यासाठी सध्या राख्यांची खरेदी सुरू झाली आहे. तसेच, चिंचवडला आस्था राखीची निर्मिती दृष्टीहीन बांधवांच्या हातून सुरू आहे. त्या माध्यमातून एकीकडे नात्यांची वीण घट्ट केली जात आहे. तर, दुसरीकडे दृष्टीहीन बांधव व गरजू महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे. या राख्या बनविण्याचे काम वर्षभर चालते.
हस्तकलेच्या माध्यमातून बनविलेल्या या राख्या कुंदन, जरी, मेटल, स्टोन यांचा वापर करून तयार केल्या जातात. सुंदर, मनमोहक व आकर्षक असणाऱ्या या राख्या आता बाजारपेठ दाखल होत आहेत. संबंधित राख्यांना विशेष मागणी आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात त्या पोहचविल्या जातात. भारतीय बनावटीची ही राखी जास्तीत जास्त बहिणींनी खरेदी करावी, असे आवाहन येथील दृष्टिहीन बांधवांनी केले आहे.
“राखीच्या व्यवसायामध्ये गेल्या सात वर्षांपासून आम्हाला सामावून घेतले आहे. त्यामुळे आम्हाला रोजगार मिळाला आहे. त्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.”
– संतोष राऊत, दृष्टीहीन तरुण.
“राखीच्या व्यवसायात आम्ही दृष्टीहीन बांधव व गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. नेत्रदानाच्या बाबतीत समाजात बरेच गैरसमज आहेत. हा गैरसमज दूर व्हावा आणि त्याबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने आम्ही प्रत्येक राखीवर “नेत्रदान-श्रेष्ठदान’ हा संदेश देत असतो.”
– सीमा कुंकुलोळ, संचालिका, आस्था राखी.