पुणे जिल्हा | नातं पंधराशे रुपयांनी विकत घ्यायचं नसतं

इंदापूर, (प्रतिनिधी)- नातं पंधराशे रुपयांनी विकत घ्यायचं नसतं, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या नेत्यांना लगावला.
इंदापूर येथे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ६३ विवाह मोठ्या दिमाखात पार पडले. सोहळ्याचे आयोजन, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी केले होते. यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देताना खासदार सुळे बोलत होत्या.
यावेळी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, उत्तमराव जानकर, सुदाम इंगळे, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, भरत शहा, अविनाश घोलप, एडवोकेट राहुल मखरे, अंकिता शहा, राजेश जामदार, अशोक घोगरे, महारुद्र पाटील, अमोल भिसे, विलास वाघमोडे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, सामुदायिक विवाह सोहळ्याचा देखणा कार्यक्रम माने कुटुंबीयांच्या आशीर्वादाने होत आहे. माने कुटुंबाचे व पवार कुटुंबियांचे पाच दशकाचे ऋणानुबंध आहेत. पवार साहेबांचे आणि माने दादाच जे प्रेम आहे.त्या दोघांचे खूप विश्वासाचे प्रेमाचे नाते आहे.
माझं लग्न खरच आई-वडिलांनी खूप साध्या पद्धतीने केलं होतं. एकच पेढा माझ्या लग्नात उपस्थित असणाऱ्यांना देण्यात आला होता. माझ्या आई-वडिलांच्या वतीने त्यावेळेच्या उपस्थित लोकांचे आज मी दिलगिरी व्यक्त करते.
माझे लग्न एवढ्यासाठी साधे केली होती की, आपण लोकप्रतिनिधी आहोत. लोक आपल्याकडे बघत असतात. त्या म्हणाल्या की, इलेक्शन येतात आणि जातात. यामध्ये फार अडकायचे नसते. नाती जपायचे असतात.
हवा बदल रही है असा सूचक इशारा देत स्टेजवर नसलेले देखील आपल्याजवळ येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नव्या पिढीमध्ये खर्च कमी करण्याची जी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून प्रथा चालू केली आहे.
ती कौतुकास्पद आहे. असेही कौतुक माने परिवाराचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी स्वागत आयोजक माजी सभापती प्रवीण माने व सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी केले.
“आमच्याकडे धोंड्याचे जेवण नसते”
धोंड्याच्या जेवणाचा किस्सा सांगताना खासदार सुळे म्हणाल्या की, आमच्याकडे धोंडेचे जेवणच नसते. पवारांकडे नसते, शिंदेंकडे नसते. मला धोंड्याचे जेवणच माहिती नव्हते. मी एकदा रील बघत होते.
त्यावेळेस माहिती झाले. सदानंद सुळे यांना कधी पवारांनी जेवायला बोलावले नाही. तर शिंदे यांनी कधी शरद पवारांना धोंड्याचे जेवण दिले नाही. त्यामुळे आम्हाला धोंड्याचे जेवण माहित नाही. सामाजिक परिवर्तन आपल्या कृतीमधून झाले पाहिजे.





