न्यायालयात घटस्फोटांसाठी दाखल निम्म्या दाव्यात फोटो चॅटिंगचा पुरावा
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – सोशल मीडियाचा वापर नात्यांसाठी घातक ठरत आहे. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 50 टक्के दाव्यात पुरावे म्हणून सोशल मीडियावरील जोडीदाराचे फोटो देण्यात येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा किती वापर करायचा, याचा नागरिक, तरुणांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटरसह विविध माध्यमांचा ज्येष्ठांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांकडूनच मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मात्र, तोच संसारासाठी घातक ठरत आहे. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये यावरील फोटो आणि चॅटिंगवरून संशय निर्माण होतो. तो थेट कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे.
लग्नापूर्वीच पती-पत्नीचे इतर मित्रांसोबत काढलेले फोटो न्यायालयात पुरावे म्हणून दाखल होत आहे. ते फोटो कधी काढले, त्याचे इंटेशन काय होते, लग्नापूर्वी असलेल्या गुपिताची माहिती जरी जोडीदाराला दिली, तरी कालांतराने तो त्याचा पुरावा म्हणून वापर करत आहे. चॅटिंगचेही तसेच आहे, कोणत्या परिस्थितीत कोणाशी चॅटिंग केले, त्यावेळी तो मोबाइल कोणाकडे होता, याचा विचार न कराता तो पुरावा दाखल होत आहे. कधीकधी फोटो क्रॉफ्टही केले जात असतात.
थोडक्यात, तरुणांना अगदी पाच ते दहा वर्षांपूर्वी फिरायला गेल्यानंतर अथवा इतर कारणांमुळे सोशल मीडियावर टाकलेले फोटो अंगलट येत आहेत. सुखी संसारात संशयाचे विष निर्माण करत आहे.
सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा. कामापुरता मर्यादीत करावा. एकमेकांशी बोलण्याचे माध्यम न बनविता सोय म्हणून तात्पुरता वापर करावा. ऍप्लिकेशनवर विश्वास न ठेवता दाम्पत्याने एकामेकांवर विश्वास ठेवावा. जेणेकरून कुटुंब, पती-पत्नीमध्ये वाद थांबतील.
– ऍड. कल्पना निकम, कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टीस करणाऱ्या वकील