विश्रांतवाडी – बापूसाहेब पठारे यांनी आमच्या परिसरातील विकासकामे केली होती. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून लक्ष घातले होते. एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. यापुढेही ते एकमताने एकजुटीने विकासाचे ध्येय पूर्ण करणार आहेत. त्यांना विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, मुंजाबावस्ती, लोहगाव परिसरातून मोठे मताधिक्क्य मिळवून देणार आहे, असा विश्वास माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी दिला.
वडगावशेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे व
कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकात टिंगरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी वडगावशेरीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्यासह पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के उपस्थित होते.
रेखा टिंगरे यांनी २००७ ते २०१७ दरम्यान झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा विजय मिळवून महापालिकेत प्रभाग एकचे नेतृत्व केले आहे. त्यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात धानोरी, विश्रांतवाडी, कळस, टिंगरेनगर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. तसेच त्यांचा व त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांचा प्रभाग एकमध्ये मोठा जनसंपर्क आहे. लोहगाव, टिंगरेनगर परिसरात देखील त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. याचा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना नक्कीच फायदा होणार आहे.
टिंगरेंच्या प्रवेशाने महाविकास आघाडीला बळकटी – बापूसाहेब पठारे
मतदारसंघाच्या विकासासाठी टिंगरे यांनी घेतलेल्या प्रवेशाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे. त्यांच्या प्रवेशाने नक्कीच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला तसेच एकूणच महाविकास आघाडीला बळकटी येईल. तसेच, आगामी विजयाच्या या प्रवासात त्यांचे योगदान मोलाचे ठरेल. विकासकामांच्या खात्रीमुळे मला मतदार संघात पाठिंबा वाढत आहे. वाढत्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित आहे, असे बापूसाहेब पठारे यांनी काढले.