प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 -राज्यात सत्ताबदल होताच शिंदे-भाजप सरकारने महापालिका निवडणुकांसाठीची प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पहिला धक्का पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला असून, राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 1 कळस-धानोरीमधून एक वेळा कॉंग्रेसमधून आणि दोन वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका रेखा टिंगरे भाजपमधे दाखल झाल्या आहेत. मंगळवारी पुण्यातील एका कार्यक्रमात टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हा प्रवेश घडवून आणला असून, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांना शह देण्यात आल्याची राजकीय चर्चा आहे. दरम्यान, टिंगरे यांच्या अचानक झालेल्या या प्रवेशाने टिंगरे या सातत्याने पक्षाच्या विरोधात काम करत असल्याने राष्ट्रवादी महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकिट कापणार असल्याने भाजपमध्ये गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
टिंगरे या 2007 मध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून कॉंग्रेसच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2012 आणि 2017 मध्ये त्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
ही सुरुवात आहे, भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या 18 जणांनी प्रवेशाची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादीचे आमदार तिथेच हा प्रवेश झाला असल्याने त्यांना धक्का आहे.
– जगदीश मुळीक,
शहराध्यक्ष, भाजप
टिंगरे आधीपासूनच भाजपचे काम करत होत्या. त्या स्वत: आणि त्यांचे पती पक्षाच्या विरोधातच काम करत होते. त्या आधीपासूनच भाजपमध्ये असल्याने ही केवळ प्रवेशाची औपचारिकता होती.
– सुनील टिंगरे,
आमदार, वडगावशेरी