नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकत्या रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात सुनावणीच्या वेळी आरोपी बाळ बोठेने स्वत: उपस्थित राहावे, असा अर्ज सरकारी वकिलांमार्फत केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली.
ही मागणी न्यायालयाने नाकारली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणी वेळी आरोपी बोठे हा हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ऍड. महेश तवले यांच्यातर्फे अर्ज केला आहे.
या अर्जावर 11 डिसेंबरला सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाला त्यांचे म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सुनावणीच्या वेळी आरोपी बाळ बोठे याने स्वत: उपस्थित राहावे, असा अर्ज पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आला होता. या अर्जावर आज सोमवारी (दि.14) रोजी सुनावणी झाली.
सुनावणी वेळी सरकारी पक्षाच्यावतीने सांगण्यात आले की, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपीने स्वत: कोर्टात हजर राहणे आवश्यक आहे, तर आरोपीचे वकील तवले यांनी म्हटले की, पोलिसांनी आरोपी कोर्टात हजर राहण्याचे ठोस कारण दिलेले नाही.
पोलिसांना आरोपीला अटक करायचे आहे, अटक करण्यासाठीच हजर राहण्यास सांगितले आहे. अशिलास अगोदर अटकेपासून संरक्षण द्यावे, तरच हजर करता येईल, असा युक्तिवाद केला. दरम्यान, कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्या समोर सुनावणी झाली.