नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्याकांडातील ( Rekha Jare murder case ) संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे ( bal bothe ) याच्यापासून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका आहे. बोठे याच्यापासून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा ( rekha jare son ) रुणाल भाऊसाहेब जरे यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी (दि.7) निवेदन दिले आहे.
या निवेदनात रुणाल जरे यांनी म्हटले आहे की, बोठे याची आमच्या घरी नेहमी ये-जा असायची. तो माझ्या आईला नेहमी जिवे मारण्याची धमकी द्यायचा. तुला नाही, तर तुझ्या मुलांना जीवंत सोडणार नाही असेही तो बोलायचा. आमच्या कुटुंबियांवर बोठे याची मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कुणीच त्याच्या विरोधात बोलत नव्हतो.
माझ्या आईने त्याच्या विरोधात या आधी कोतवाली पोलीस ठाण्यात अर्जही दिले आहेत. बोठे याच्यापासून आमच्या जीविताला धोका असल्याने आम्हाला लवकरात लवकर पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील ( Rekha Jare murder case ) प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयामाला माने यांनीही सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेवून पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. माने व जरे कुटुंबियांनी संरक्षणाची मागणी केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे ( ncp worker rekha jare murder ) यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी बाळ बोठे हा नाशिक येथे असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. माहितीनुसार तपास पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. ज्या हॉटेलमध्ये तो थांबला असल्याची माहिती मिळाली होती, त्या हॉटेलवर पोलिसांनी छापा घातला. मात्र, त्या आधीच संशयीत आरोपी बोठे हा तेथून पसार झाला.
आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
रेखा जरे खून प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपी ताब्यात घेतले होते. त्यांना पारनेर न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुन्हा त्यांना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.