नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेचे मौन सुटले. हत्याकांडाबाबत माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे हत्या का केली, कसा कट रचला, रसद कशी पोचली, याबाबत लवकरच उलगडा होणार आहे. तसेच, कट रचलेल्या घटनास्थळांचा पंचनामा केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजली.
रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे गेल्या 102 दिवसांपासून फरार होता. त्याला पोलिसांनी हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. अटक केल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तेव्हापासून पोलीस त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. याबाबत पोलिसांना यश आले असून, पोलिसांना जी माहिती अपेक्षित होती ती मिळाली आहे.
जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावत अत्यल्प काळात यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद होते. आता बोठे याची पोलीस कसून चौकशी सुरू असून, संशयित सूत्रधार बोठेचे मौन सुटले आहे.
अन्यथा बोठेचा मोबाइल कंपनीकडे पाठविणार
गेल्या अनेक दिवसापासून संशयित आरोपी बाळ बोठे याचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्यातून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र, मोबाइलचा लॉक उघडण्यास पोलिसांना अपशय आले आहे. त्यामुळे मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे. तिथे लॉक उघडण्यात अयशस्वी झाले तर तो मोबाइल कंपनीकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
हॉटस्अप कॉलिंगचा आधार
आरोपी बोठे याने संपर्कासाठी हॉटस्अप कॉलिंगचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. आरोपी बोठे हा नगरमधील महेश तनपुरे याच्या मोबाइलवर हॉटस्अप कॉलिंग करीत होता. त्यासाठी तनपुरे बोठे याच्या घरी जायचा किंवा बोठे याचे नातेवाइक तनपुरेच्या घरी जात होते. मात्र, बोठे याने स्वत:चा ठावठिकाणा त्यांना सांगितला नाही. मी जिथे आहे तिथे सुखरूप आहे, असे तो सांगत होता, असेही तपासात पुढे आले आहे.