रेखा जरे खून प्रकरण : बाळ बोठेच्या अटकेसाठी रुणाल जरेचे उपोषण सुरु

नगर (प्रतिनिधी) –  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अद्यापही पोलिसांनी अटक केली नसल्याने, त्याला त्वरीत अटक करावी या मागणीसाठी जरे यांचा मुलगा रुणाल जरे व त्यांची आई सिंधुबाई वायकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज उपोषण सुरु केले आहे.

दरम्यान, रेखा जरे यांच्या मुलाच्या उपोषणाला भूमाता ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी बाळ बोठे याला अटक करा या मागणीला जोर धरला आहे. 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगावच्या घाटात हत्या झाली. 

पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पाच आरोपी तत्काळ जेरबंद केले. या आरोपींकडून बोठे याचे नाव समोर आले. बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हत्या झाल्यापासून बोठे पसार आहे. या हत्याकांडाला तीन महिने पूर्ण होत असून, अद्यापही बोठे सापडलेला नाही.

तसेच बोठे याला पारनेर न्यायालयाने फरार घोेषित केले आहे. याबाबात न्या. उमा बोर्‍हाडे यांनी आदेश दिला आहे. तसेच न्यायालयाने 9 एप्रिल पर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुध्द (दि.26) रोजी पोलिसांनी पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.