आरोपींची संख्या पोहचली पाचवर; दोघांनाही आज दुपारी न्यायालयात हजर करणार
नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून केल्याच्या आरोपावरुन संशयित मुख्य सूत्रधार सागर भिंगारदिवे याच्यासह ऋषीकेश पवार या दोघांना आज पोलिसांनी अटक केली.
जरे यांच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या दोघाही आरोपींना आज दुपारनंतर पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपास अधिकारी अजित पाटील यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांसह आता आरोपींची संख्या पाचवर पोचली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघाही संशयित आरोपींना सात डिसेंबरपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती. रेखा जरे यांच्या सॅन्टो कारचा कट लागल्याने मोटारसायकवरुन आलेल्या दोघा जणांनी पाठलाग करत जरे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, घटनेवेळी त्यातील एकाने हल्ला केल्यानंतर मोबाईलवर फोटोही काढला होता. त्यामुळे हा खून असल्याचा संशय त्याचवेळी बळावला होता.
घटनेमागील खऱ्या कारणाची उत्कंठा…!
पोलीस तपासात रेखा जरे यांना संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघा हल्लेखोरांव्यतिरिक्त आणखी काही जणांचा या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या चोवीस तासांच्या आत यातील आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने गुन्ह्याचा उलगडा होत गेला आहे. तथापि, खुनाचे कारण अजुनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे खुनाच्या कटात सहभागी असलेल्यांना अटक झाली असली तरी नगरकरांना खुनाच्या कारणाची उत्कंठा आहे.