नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या विरोधात आज खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगल भुजबळ-हजारे यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून, त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
बोठे याच्यावर रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आज सोमवारी त्याच्यासह डॉ. भागवत दहिफळे विरोधात 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप झाल्याने बोठे याच्या अडचणीत आज आणखी वाढ झाली आहे. जरे यांचा खून, त्यानंतर एका विवाहित महिलेचा विनयभंग व आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस यंत्रणेवरील ताणही वाढला आहे.
हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीत खंडणी मागितल्याबद्दलचा घटनाक्रम स्पष्ट केला आहे. जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक म्हणून कंत्राटी स्वरूपात नोकरी करत असताना बाळ बोठे याने आमच्या कार्यालयात माहितीचा अर्ज देवून माझी वैयक्तीक माहिती मागितली होती. त्यात नोकरी लपवून महापालिकेची निवडणूक लढविली, अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती. त्यानंतर बोठे याने मला 11 ऑगस्ट 2019 रोजी बोलाविल्यावरून मी त्याला जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर भेटले. तेव्हा तो मला म्हणाला तुमच्या कार्यालयातील डॉ. भागवत दहिफळे माझे चांगले मित्र आहेत.
तुमच्या कार्यालयातील सर्व गोपनीय माहिती ते मला पुरवितात. त्यामुळे तुमच्या कार्यालयातील बरीच माहिती माझ्याकडे प्राप्त झाली आहे. तुम्ही कार्यालयाची परवानगी न घेता निवडणूक लढविली आहे, हा महत्त्वाचा मुद्दा माझ्या हाती लागला आहे. त्यातून तुम्हाला सहीसलामत बाहेर पडायचे असेल, तर 10 लाख रुपयांची तडजोड करा, असे म्हणत त्याने मला खंडणी मागितली, असा दावा मंगल हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे.