नगर-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर आज आदेश होण्याची शक्यता होती. तथापि, न्यायालयाने त्या अर्जावरील आदेश राखून ठेवला आहे.
दरम्यान, पोलिसांनाच त्या आदेशाची प्रतीक्षा असून, त्याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल, अशी माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. गेल्या 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीत जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झालेेली आहे.
त्या हत्याकांडाची अवघ्या चोवीस तासांत उकल करत दोनच दिवसांत पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यातील संशयित आरोपी सागर भिंगारदिवे यास अटक झाल्यानंतर त्याच्याकडील तपासातून या हत्यकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
मात्र, त्याच दिवशी बोठे पसार झाला. तेव्हापासून तो पोलिसांच्या तपासी पथकांना गुंगारा देत आहे. बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी देखील जिल्हा न्यायालयात प्रयत्न केले. मात्र, जिल्हा न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे. बोठे याच्या शोधासाठी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे घातले. परंतु बोठेला पकडण्यात पोलिसांना अजून यश आले नाही. अजूनही पोलिसांची पथके बोठे याच्या मागावर आहेत.
या दरम्यान, पोलीस दलाने बोठेभोवती कायद्याचा फास आवळण्याची तयारी सुरू केली आहे. जरे हत्याकांड प्रकरणातील महत्त्वाचे आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या डायरीतील टिपणांमुळे बोठे याच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे.