नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्याकांडातील ( Rekha Jare murder case ) मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे ( bal bothe ) याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.11) सुनावणी होणार आहे.
बोठे याने ( bal bothe ) अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी येथील जिल्हा न्यायालयात काल अर्ज दाखल केला होता. हा अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया आज झाली. संशयित आरोपीच्या वतीने आज न्यायालयात बाजू मांडण्यात आली. त्यावर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागविले आहे. आता पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी (ता. 11) सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वतीने ऍड. महेश तवले यांनी बाजू मांडली.
रेखा जरे यांच्या हत्याकांडात ( Rekha Jare murder case ) आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यात मुख्य सूत्रधार असलेला बोठे अद्याप पोलिसांना सापडू शकलेला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. असे असताना त्याने अटकपूर्व जामीनासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज केल्याने त्यावरील सुनावणी व निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरे हत्याकांड जिल्ह्यात चांगले गाजत आहे. आहे. या प्रकारात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. जरे यांच्या मुलाने पोलीस अधीक्षकांना एक अर्ज दिला असून, त्यात बोठे व त्याच्या हस्तकाकडून आपल्यासह वडील, आजी, पत्नी, भाऊ यांच्या जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
तसेच या हत्याकांडाच्या प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनीही आपल्या जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे. जरे यांच्या मुलाने बोठे याच्याकडून आपल्या आईचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, बोठे ( bal bothe ) याच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ऍड. सुरेश लगड यांनी केली आहे. तसेच बोठे याची पुणे विद्यापीठ अभ्यासमंडळावर झालेली निवडही रद्द करण्याची मागणीही लगड यांनी केली आहे.