नगर (प्रतिनिधी) – बाळ बोठे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता येत्या 28 जानेवारीला सुनावणी होईल. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर पोलिसांनीही म्हणणे सादर करावे, असे आदेश आज न्यायालयाने दिले.
30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावर पारनेर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या जातेगाव घाटात रेखा जरे यांची रात्री पावणेआठच्या सुमारास गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यातील तपासात ही हत्या सुपारी देवूनच झाल्याने उघड झाले असून, त्यात बाळ बोठे हाच संशयित मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
अवघ्या चोवीस तासांत खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपी गजाआड केलेले आहेत. त्यातील सागर भिंगारदिवे या संशयित आरोपीने दिलेल्या जबाबातून बाळ बोठे याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या 2 डिसेंबर 2020 रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत या खुनाचा घटनाक्रम व सूत्रधार बाळ बोठे असल्याचे घोषित केले होते.
दरम्यान, तेंव्हापासूनच बोठे पसार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नगरसह राज्यात अनेक ठिकाणी छापे घातले. मात्र, बोठे हाती लागला नाही. त्यामुळे अखेरीस बोठे यास पकडण्यासाठी पोलिसांकडून पारनेर न्यायालयात स्टँडिंग वॉरंटचा अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने तो मंजूर केल्यानंतर राज्यभरातील बहुतेक पोलीस ठाण्यात स्टँडिंग वॉरंटचे आदेश पाठविण्यात आलेला आहे.
दरम्यान, बोठे याच्यावतीने नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. तो अर्ज फेटाळल्याने बोठे याच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी होती. ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.