नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणी मुख्य सूत्रधार बाळ बोठेसह सहा जणांना बुधवारी जिल्हा न्यायालयात दोषनिश्चितीसाठी आणले होते. या खटल्याची नियमित सुनावणी 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर ही सुनावणी होत आहे.
दरम्यान, बुधवारी बोठेसह इतर दोघांचे विविध अर्ज न्यायालयासमोर आल्यामुळे दोषनिश्चिती झाली नाही. सर्व अर्जांवर आता 6 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
नगर-पुणे महामार्गावर 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. बाळ बोठे हा या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आल्यानंतर बोठेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बोठे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती.
सागर भिंगारदिवे याने 15 दिवसांच्या जामीनाची मागणी केली होती. त्याच्या वतीने ऍड. रोमान सय्यद यांनी बाजू मांडली. आदित्य चोळके याच्याकडूनही अर्ज करण्यात आला होता. या सर्व अर्जांवर सुनावणी झाली. मयत जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांच्या वतीने ऍड. सचिन पटेकर यांनी बाजू मांडत आरोपींच्या जामिनाला विरोध दर्शवला. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांच्या वतीने त्यांचे सहकारी ऍड. जोशी यांनी बाजू मांडली.