रेखा जरे खून प्रकरण: सर्वच पोलीस ठाण्यांत पाठविला बोठेच्या ‘स्टँडिंग वॉरंट’चा आदेश

नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या  संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या विरोधात मंजूर करण्यात आलेला स्टँडींग वॉरंटचा आदेश आज जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांत पाठविण्यात आला.

स्टँडिंग वॉरंटचा आदेश जारी करण्यात आल्याने तपासाला आता गती आली असून बोठे याच्याभोवतीचा फास आणखी आवळण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘बोठे जिथे दिसेल तेथे त्याला पकडा’ असे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्यराची माहिती सूत्रांनी दिली.

बोठे यांच्या विरोधात पारनेर न्यायालयात दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंटवर  बुधवारी (दि. 6) रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी आदेश दिला. त्याच्या प्रति सर्व पोलीस ठाण्यात देण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच अटक वॉरंट काढून आरोपीस ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रात्री हत्या झाली. त्या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलेली आहे. त्या हत्येमागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तेव्हापासून बाळ बोठेे हा पसार आहे. बोठे याच्या शोधासाठी पोलीस महिन्याभरापासून त्याच्या मागावर आहेत. तथापि, त्याचा ठावठिकाणा अजुनही लागलेला नाही.

दरम्यान बोठे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी बोठेविरुद्ध स्टँडिंग वॉरंटसाठी पारनेर न्यायालयात 1 जानेवारीला अर्ज केला होता. बोठे याने या अर्जाला आव्हान दिले.  त्याच्यातर्फे अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी बाजू मांडली. मात्र, न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मंजूर केला. आता बोठे याच्या खंडपीठातील अर्जाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.