नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला आता कथित विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात शहरातील एका महिलेने हा गुन्हा दाखल केलेला आहे.
रेखा जरे हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यास पुन्हा पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यात त्याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर लगेचच कोतवाली पोलिसांनी केलेल्या अर्जानुसार बोठे याचा ताबा न्यायालयाने कोतवाली पोलिसांकडे दिला.
पारनेर येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी उमा बोराडे यांच्यासमोर हे युक्तीवाद झाले. कोतवाली पोलिसांनी यापूर्वीच बोठे याचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात पत्रव्यवहार केला होता. त्याला विनयभंगाच्या गुन्हा वर्ग करावे, असा अर्ज त्यांनी केला होता.
रेखा जरे पाटील यांच्या हत्येनंतर संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या विरोधात शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून कोतवाली पोलीसही त्याचा शोध घेत होते.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या गुन्ह्यात संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास पोलिसांनी हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक केली होती.