नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्यांपैकी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे या दोघांना 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, यातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.
रेखा जरे यांच्या हत्याकांडात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यात मुख्य सूत्रधार असलेला बोठे अद्याप पोलिसांना सापडू शकलेला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान संशयीत आरोपी शिंदे व शेख यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपली असता, त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पुन्हा 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तसेच संशयीत आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे, आदित्य सुधाकर चोळके व हृषीकेश ऊर्फ टप्या वसंत पवार यांच्या पोलीस कोठडीत यांना 9 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
बोठे याच्या अर्जावर आज सुनावणी
रेखा जरे यांच्या हत्येतील फरार असलेला संशयीत मुख्य आरोपी बाळ बोठे याने ऍड. महेश तवले यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. त्यावर 8 डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती.
त्यावेळी संशयीत आरोपी बोठे यांच्या वकिलाचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागितले होते. त्यावर उद्या (दि.11) सुनावणी होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.