रेहेकुरीतील पाणवठे कोरडे; वृक्षतोडीतही वाढ

कर्जत: कर्जत तालुक्‍यातील रेहेकुरी अभयारण्यासह राक्षसवाडी, नांदगाव, धालवडी, दूरगाव, गुंडाचीवाडी आदी भागातील वनक्षेत्रात होत असलेल्या वृक्षतोडीने जंगलक्षेत्र भकास झाले आहे. विरळ झालेल्या जंगलामुळे वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. वनविभागाकडून वन्य प्राण्यांसाठी बांधण्यात आलेल्या पाणवठ्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी सोडले जात नसल्याने, वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ सैरभैर झाले आहेत. पाण्याच्या शोधात भटकंती करताना या वनक्षेत्रात अनेक हरणे तसेच काळविटांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या चार महिन्यात तीन हरणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

कर्जत तालुक्‍यात मोठे वनक्षेत्र आहे. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे येथील जंगलात मोठया प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. जंगलात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने झाडा-झुडपांची वाट लागली आहे. वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाल्याने हे प्राणी आडोसा शोधताना दिसतात. चारा पाण्याच्या शोधात हरिण, काळविटे शेतात येतात व त्यांची शिकार साधली जाते. उन्हाच्या झळांनी व्याकूळ झालेली हरणे, काळविटे, ससे, लांडगे, कोल्हे आदी प्राणी उजाड माळरानावर सैरभैर धावताना दिसतात.

पुरेशा पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्‍न बिकट आहे. तसेच पाणी नसल्याने या वन्य प्राण्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. वनक्षेत्रात अनेक ठिकाणी पाणवठे बांधण्यात आले आहेत. पाणवठ्याजवळ नियमित पाणीपुरवठ्यासाठी हातपंप बसवण्यात आले आहेत. मात्र वनमजुरांच्या दुर्लक्षामुळे पाणवठे कोरडे पडलेले आहेत. रेहेकुरी अभयारण्याच्या पश्‍चिम व दक्षिण भागातील दोन्ही पाणवठे कोरडेठाक आहेत. या भागातील पाणवठ्यात पाणी सोडल्यास जंगलाबाहेर जनावरे येऊन त्याचा वापर करीत असल्याने हे पाणवठे भरले जात नसल्याचे, वन मजुरांनी खासगीत बोलताना सांगितले. यातून वन विभागाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन होत आहे. या प्रकारामुळे वन्यप्राण्यांना मात्र पाण्याच्या शोधार्थ मैलोन मैल धाव घ्यावी लागत आहे.


हरणांच्या मृत्यूच्या प्रमाणात झाली वाढ

कुळधरण तसेच रेहेकुरी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे वनक्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. वनक्षेत्रात दिवसाढवळ्या शिकारी होत आहेत. ससे, पारवे, कबूतर यांची राशीन आठवडे बाजारात सर्रासपणे विक्री केली जात आहे. कुळधरण हे गाव डॉ.श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत बसलेले आहे. 12 लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. मात्र या भागात पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. याची पुणे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.