हात, मनगटे व खांदे मजबूत करणारे बकासन नियमित कराच

बकासन हे तुलनेने थोडेसे अवघड आसन आहे. बकासन हे नाव बक या संस्कृत शब्दापासून बनलेले आहे. बक म्हणजे म्हणजे बगळा. हे तोलात्मक आसन आहे. या आसनाची शेवटची अवस्था बगळ्यासारखी दिसते म्हणून याला बकासन असे नाव देण्यात आलेले आहे. पाण्यात एका पायावर उभा असलेला बगळा म्हणजे एकाग्रतेचे मूर्तिमंत प्रतीक, नियमित केलेल्या बकासनामुळेही एकाग्रता वाढण्यास मदत होते. बकासन हे आसन थोडेसे अवघड आसन असले, तरी रोजच्या सरावाने व काळजीपूर्वक केल्याने ते जमू लागते. मात्र बकासन करताना खूप घाईगडबडीने करू नये. शांत चित्ताने सराव करावा, अन्यथा पडण्याची शक्‍यता असते.

प्रथम उभे राहून कंबरेतून पुढे वाकावे. दोन्ही हाताचे तळवे पावलांसमोर जमिनीवर टेकवावेत. नंतर हळूहळू डावा गुडघा डाव्या काखेच्या व दंडाच्या आतील बाजूला टेकवावा.

हळूहळू हाताच्या तळव्यांवर पूर्ण शरीराचे वजन सांभाळून पावले वर उचलावीत व जुळवावीत. गुडघे ज्या स्थितीमध्ये ठेवले आहेत, तसेच ठेवावेत. मान थोडीशी वरच्या दिशेला घ्यावी. हाताचे कोपरे ताठ ठेवावेत. श्‍वसन संथ सुरू ठेवावे. जेवढा वेळ स्थिर राहाणे शक्‍य आहे, तेवढा वेळ ही आसनस्थिती टिकवावी. हे आसन 3 ते 5 वेळा करावे.

आसन सोडताना सावकाश पावले जमिनीला टेकवावी व हळूहळू पूर्वस्थितीत यावे.
हे थोडेसे अवघड आसन आहे. परंतु लहान मुलांच्या योगासन स्पर्धेच्या अभ्यासक्रमात याचा समावेश आहे. बकासनाच्या अभ्यासामुळे एकाग्रता वाढते. हे मनगट व हाताची ताकद वाढण्यास उपयोगी आहे. परंतु सुरुवातीला सराव करताना योग्य मार्गदर्शनाखालीच करावा. एकट्याने सराव करताना पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊनच सराव करावा.

बकासनाचे फायदे-
शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते.
हात, मनगटे व खांदे मजबूत होतात.
छातीसाठीही बकासन उत्तम आहे. याने छाती मजबूत होते. फुफ्फुसांसाठीही हा सर्वोत्तम योगाभ्यास आहे.

मुलांसाठी हे उत्तम योगासन आहे.
सावधगिरीची सूचना-
उच्च रक्‍तदाब असलेल्या व्यक्‍तींनी हे आसन करू नये.
हृदयरोग असणाऱ्या व्यक्‍तींनी हे आसन करू नये.
खांद्याला दुखापत झालेली असेल वा खांद्यात वेदना असेल तर बकासन करू नये.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.