पुणे – चीननंतर करोना विषाणुचा प्रादुर्भाव हॉन्गकॉंग, थायलंड, सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनमधील वुहान शहरातून 645 भारतीयांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणले. या सर्वांना आयटीबीपी नवी दिल्ली आणि आर्मी कॅम्प, मानेसर येथील विलगीकरण कक्षात दाखल करून 14 दिवस देखरेख करण्यात आली. या सर्वांचे नमुने निगेटीव्ह आले असून, त्यांना घरी सोडले आहे. त्यातील 36 व्यक्ती महाराष्ट्रातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात आलेल्या या 36 व्यक्तींचा खबरदारी म्हणून ज्या त्या जिल्ह्यातील डॉक्टरांनी आणखीन पुढील 14 दिवस पाठपुरावा करावा. त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास विलगीकरण कक्षात दाखल करावे, अशा सूचना केंद्रीय व राज्य आरोग्य विभागाने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, आतापर्यंत बाधीत देशातून आलेल्या एकून 266 पैकी 142 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. दोन दिवसांत आणखीन दोन व्यक्ती विलगीकरण कक्षात भरती झाले असून, त्यांचे नमुने शुक्रवारी येणार आहे.
करोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे
सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड)
गंभीर स्वरुपाची श्वसन संस्थेची लक्षणे
श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा
न्यूमोनिआ
पचनसंस्थेची लक्षणे; अतिसार
काही रुग्णांमध्ये मुत्रपिंड निकामी होणे
प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये असामान्य लक्षणे आढळू शकतात.
अशी घ्यावी खबरदारी….
सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप लक्षात घेता हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रथमत: श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे. हातांची नियमित स्वच्छता. न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नये. खोकताना, शिंकताना नाका तोंडावर रूमाल किंवा टिश्यू पेपर वापरावा.