पुणे – राज्यातील सहा विभागीय क्षेत्रांत इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी तब्बल 93 हजार 655 हजार विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना लॉग-इन आयडी व पासवर्डही मिळाले आहेत. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक तर अमरावतीत सर्वांत कमी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आलेली आहे. पुणे विभागात 299 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 4 हजार 12 एवढ्या प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सराव करण्याकरीता 16 ते 24 जुलैदरम्यान संधी देण्यात आली होती. यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सुविधेचा लाभ घेतला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 23 हजार 654 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधी ऑनलाइन नोंदणीचे बंधन आहे. रविवारी सकाळी 11 वा.पासून विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सुविधा सुरू करण्यात आली. त्यानंतर दिवसभर अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. करोनामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसून मोबाइल, संगणक, लॅपटॉपचा वापर करुन नोंदणी करण्याला प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीद्वारे मिळालेल्या लॉग-इन आयडी व पासवर्डचा वापर करून 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरता येणार आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.