मिशन अकरावी अॅडमिशन
पुणे(प्रतिनिधी) – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी सुरू होणार आहे. त्यादृष्टीने महाविद्यालयांना ऑनलाइन नोंदणीसाठी कागदपत्रे, सहपत्रे यांची जमवाजमव करुन ठेवावी लागणार आहे.
दरवर्षी प्रमाणे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. करोना प्रसार वाढल्याने यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेस उशीर झाला आहे. दहावीचा निकालही अद्याप लागलेला नाही. या महिनाअखेर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या ठिकाणी ऑनलाइनद्वारे प्रवेश होणार आहेत.
यंदा प्रवेश प्रक्रिये सुसूत्रता आणण्याबाबत काही बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे. कमीत कमी कालावधीत यशस्वीपणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. आधी महाविद्यालयांची नोंदणी करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव तथा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक मीना शेंडकर यांनी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.
यंदा अकरावी प्रवेशासाठी नवीन एजन्सी नेमण्यात आली आहे. या एजन्सीची व अधिकाऱ्यांच्या तयारीचा व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे आढावाही घेण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मीना शेंडकर यांनी दिली आहे.