पुणे – वाहन वितरकांनी विक्री केलेल्या मात्र अद्याप आरटीओकडे नोंदणी न झालेल्या “बीएस 4′ वाहनांना 30 एप्रिलपर्यंत नोंदणी बंधनकारक आहे. यासाठी आरटीओने काही ई-मेल दिले असून यावर येत्या दोन दिवसांत माहिती भरण्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 22 फेब्रुवारी 2016 ला “बीएस-6′ वाहनांच्या सक्तीविषयी अधिसूचना काढली. त्यानुसार 1 एप्रिल 2020 आणि त्यानंतर उत्पादित होणाऱ्या आणि साडेतीन हजार किलो वजनापर्यंतच्या वाहनांची “उत्सर्जन मानके’ (इमिशन स्टॅंडर्ड) “बीएस-6’च्या निकषांप्रमाणे असणे बंधनकारक केले होते. म्हणजेच, बीएस-4 वाहनांची नोंदणी कोणत्याही परिस्थतीत 31 मार्चपर्यंत करणे अनिवार्य होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशभरात संचारबंदी लागू असल्याने वाहनांची विक्री होऊ शकली नाही. तर, काही शोरूम चालकांनी 31 मार्चपूर्वी बीएस 4 वाहनांची विक्री केली.
मात्र, लॉकडाऊनमुळे आरटीओचे कामकाज बंद असल्याने त्यांची आरटीओ कार्यालयात नोंद होऊ शकली नाही. अशा वाहनांनाबाबत पुढील कार्यवाही व्हावी यासाठी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर असोसिएशने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आशा वाहनांची यादी न्यायालयात सादर केली होती. यानंतर आता या वाहनांची नोंदणी 30 एप्रिलपर्यंत करून घेण्यास सांगण्यात आले होते.
यानुसार पुणे आरटीओ कार्यालयाने सर्व वाहन वितरकांना सूचना केली असून पुढील दोन दिवसांत ऑनलाइन पद्धतीने माहिती पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी ई-मेल आयडी देण्यात आले असून माहितीची खातरजमा केल्यानंतर संबंधित वाहनाची आरटीओ कार्यालयात नोंदणी होणार आहे. ज्या वाहनांची नोंद असोसिएशनने न्यायालयात सादर केलेल्या यादीमध्ये असणार आहे. याबरोबरच त्याच वाहनांची आरटीओत नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आली.
ई मेलवर माहिती पाठवावी. यामध्ये नोंदणी कागदपत्रे, वाहनाचा फोटो, चॅसीस क्रमांक,
विहित नोंदणी शुल्क, प्रतिज्ञापत्र आधी माहिती पाठवणे गरजेचे आहे.