पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता खात्याकडून बेरोजगार तरुण- तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्यानुसार गेल्या अडीच वर्षांत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये १७६ रोजगार मेळावे घेण्यात आले आहेत.
या मेळाव्यांसाठी तब्बल 5 लाख १६ हजार ३०२ उमेदवारांनी नोंदणी केली. मात्र, प्रत्यक्षात दोन लाख १२ हजार ३७४ जणांनाच रोजगार मिळाला आहे.
उर्वरित 3 लाख 3 हजार ९२८ जणांना कागदपत्रांची पूर्तता, संबंधित कंपनीची गरज, शिक्षण, नोंदणी करूनही रोजगार मेळाव्यांना गैरहजर राहणे, प्रथम प्रशिक्षणार्थी पद असल्याने स्वारस्य न दाखविणे अशा विविध कारणांमुळे रोजगार मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
करोना संकटामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. त्यानंतर उद्योगजगत पुन्हा हळूहळू सावरले. राज्यासह पुणे विभागात अनेक विदेशी, देशी कंपन्यांनी गुंतवणूक केल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता खात्याकडून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. गेल्या अडीच वर्षांत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत पाच लाख १६ हजार ३०२ उमेदवारांनी ‘महास्वयंम’ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली.
या काळात पुणे विभागात पुणे विभागीय आयुक्तालय ११, पुणे ३०, सातारा ३४, सांगली ३४, सोलापूर ३४ आणि कोल्हापूर ३३ असे एकूण १७६ रोजगार मेळावे घेण्यात आले.
या माध्यमातून दोन लाख १२ हजार ३७४ तरुण- तरुणींना रोजगार मिळाला. उर्वरित 3 लाख 3 हजार ९२८ जणांना विविध कारणांमुळे रोजगार मिळाला नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मागील अडीच वर्षातील पुणे विभागाची स्थिती
जिल्हा – उमेदवारांची नोंदणी – मिळालेला रोजगार
पुणे – २,१२,३१४ – १,१२,४०६
सातारा – ६९,३६६ – ३०,३७६
सांगली – ५६,५७५ – १५,७३५
सोलापूर – ८२,९१६ – १८,७५३
कोल्हापूर- ९५,१३१ – ३५,१०४
एकूण – ५,१६,३०२ – २,१२,३७४