पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी करावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचा आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, की निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी नवीन मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे, तसेच मतदान केंद्रांची जागा बदलण्यात आली आहे. तेथील मतदारांना मतदान केंद्र बदलल्याची माहिती कळविण्यात यावी.
मतदारांनी खात्री करावी
मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व एकही पात्र मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही, याची खात्री मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी करावी.
ऐनवेळच्या तक्रारी टाळण्यासाठी प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे, तसेच मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ आदी तपशीलदेखील अचूक असल्याबाबत खात्री करणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी या वेळी सांगितले.