प्रादेशिक पक्ष पुढील पंतप्रधान देतील – अखिलेश यादव

त्यांना कॉंग्रेस आणि भाजपपेक्षा अधिक जागा मिळण्याचे भाकीत
लखनौ – लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना कॉंग्रेस आणि भाजपपेक्षा अधिक जागा मिळतील. त्यामुळे पुढील पंतप्रधान प्रादेशिक पक्ष देतील, असे भाकीत समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी केले.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यांनी प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा राहील, अशा आशयाचा विश्‍वास व्यक्त केला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही. मात्र, पुढील पंतप्रधान उत्तरप्रदेशातील असेल तर आनंदच वाटेल. पंतप्रधान बनण्याची आकांक्षा असणाऱ्यांना मी पाठिंबा देईन, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ती शक्‍यता वास्तवात उतरल्यास प्रियंका यांना सप-बसप-रालोद महाआघाडी पाठिंबा देणार का, या प्रश्‍नावर अखिलेश यांनी नकारार्थी उत्तर दिले. आमची बसप आणि रालोदशी महाआघाडी झाली आहे. आम्ही लवकरच वाराणसीमधील उमेदवार जाहीर करू, अशी पुस्ती त्यांनी जोडली. आमच्या महाआघाडीमुळे भाजपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या बोलण्यातून उमटत आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.