दुष्काळ आणि बेरोजगारीकडे सपशेल दुर्लक्ष, गाफील राहू नका – राज ठाकरे 

मुंबई – राज्यात वातावरण निवडणूकमय असल्याने दुष्काळ आणि बेरोजगारी या दोन्ही गंभीर विषयांकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि यासाठी महाराष्ट्र दिन याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरेंनी एक पत्रक ट्विटर अकाउंटवर शेअर करत महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले आहेत राज ठाकरे?
राज्यात लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गेले काही आठवडे एकूणच वातावरण निवडणूकमय असल्याने सर्वांचेच दुष्काळ आणि बेरोजगारी या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष झाले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला या दोन संकटांकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ जास्त गंभीर आणि भीषण आहे, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळत असतानाच शहरांमध्ये  संघटित आणि उच्च कौशल्याधारित व्यवसायातील तरुण- तरुणी देखील त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. अनेक सरकारी आस्थापनांमध्ये पगार वेळेवर होत नसतील तर खासगी उद्योगांमध्ये काय अवस्था असेल? या दोन्ही विषयात सरकारने त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवं आणि माध्यमांनीही काटेकोरपणे या दाव्यातील तथ्य तपासायला हवे. निवडणुका येतील, जातील पण त्याच्यापलीकडे जाऊन आपल्याला या विषयांकडे बघायला हवं. सर्वच क्षेत्रात अग्रणी असलेलं राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक आहे, पण आपण वेळेत जागे झालो नाही तर हा लौकिक हातातून निसटू शकतो.

दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठवून आहे. जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करतील. तिथे तिथे दणका देत आहे. पण हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत कि, तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि यासाठी महाराष्ट्र दिन याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्र जनतेला विनंती आहे कि, दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1123450271282139137

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)