लसीकरणाविषयी राजेश टोपे म्हणाले,”राज्याचे दिवसाला १० ते १५ लाख लसीकरणाचे लक्ष्य मात्र…”

पुणे: देशात सध्या  करोनाची दुसरी लाट  ओसरताना दिसत आहे.  त्यासाठी लसीकरणाचा मोठा हातभार असल्याचे दिसत आहे.  याविषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे विधान केले आहे. लसीकरणाबाबत आपल्या राज्याला तोड नाही. सद्यस्थितीत आपल्याकडे एका दिवसात ३ लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. लवकरच हे पूर्ण होण्याच्या उद्देशाने राज्याचे एका दिवसात १० ते १५ लाख लसीकरणाचे लक्ष्य आहे. मात्र केंद्राकडून तेवढा पुरवठा केला जात नाही.

पुण्यात ‘राष्ट्रीय शितसाखळी संसाधन केंद्रा’चे उद्धघाटन सोहळयात ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते केंद्राचे उदघाटन करण्यात आले. टोपे म्हणाले, लस हे कवच कुंडल आहे. ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण होत आहे. नागरिक अजूनही लस घेण्यास पुढे येत नाहीत. आपल्या सर्वांना कोरोनाला हद्दपार करायचे आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

आपण कोरोना काळात जीव मुठीत धरून जगत आहोत. पण लसीचे दोन डोस घेतल्यावर मनातील भीती कमी होते. आपण सर्व एकत्रित या आजाराला लढा देऊ शकतो असेही ते म्हणाले आहेत. तसेच राज्याकडून सातत्याने लशींची मागणी केली जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यात दुसरी लाट येऊन गेली आहे. अनेक जिल्हयात कोरोना आटोक्यात येत आहे. पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यदर कमी झाला आहे. तर लसीकरणही जोरात सुरु आहे. केंद्राकडून तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. पण आपण लसीकरणावर भर दिल्यास तिसऱ्या लाटेचा धोका नक्कीच कमी होईल.

राज्य त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी तिसऱ्या लाटेची चिंता, भीती मनात बाळगू नये. पण कोरोना नियम पाळण्याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

राष्ट्रीय शितसाखळी संसाधन केंद्राने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. याठिकाणी लसीचे स्टोरेज, व्यवस्थापन करण्यात येणार आहे. हे देशातही अनेक ठिकाणी असे केंद्र उभारले जातील. तसेच कोल्ड स्टोरेज करण्याचे प्रशिक्षणहि या केंद्रात दिले जाणार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात अशा बाहेरील राज्यातील नागरिक येथे शिकण्यासाठी येऊ शकतात असेही ते म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.